| अलिबाग | प्रतिनिधी |
सध्याचे राजकारण अतिशय भयावह आहे. अनेक तरुणांना नोकरीचे गाजर दाखविले जाते. परंतु, त्यांना वेतन दिले जात नाही. नोकरी व रस्त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. हनी ट्रॅप, ऑनलाईन रमीमध्ये नेते मग्न आहेत. अलिबागसह अनेक भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होत आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष एक वेगळ्या भुमिकेतून आगामी काळात काम करणार आहे. रोजगारासह वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा दिला जाणार आहे. जनतेचे प्रश्न शेकापच सोडविणार असा विश्वास शेकाप राज्य सोशल मिडीया प्रमुख तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला.
शेकाप वर्धापन दिन व इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या. यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, प्रफुल्ल पाटील, अवधूत पाटील, विक्रांत वार्डे, वेदांत कंटक आदी उपस्थित होते. यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन दोन ऑगस्टला होणार आहे. या मेळाव्यात महाराष्ट्राचे नेते राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत शेतकरी कामगार पक्षाचे योगदान राहिले आहे. परंतु, सध्याच्या राजकारणात राज्यात मराठी भाषेवर अतिक्रमण झालेले दिसत आहे. त्यामुळे या विरोधात शेकापची भुमिका कायमच राहिली आहे. याबाबत शेकापचे नेते जयंत पाटील यांनी त्यांची भुमिका वेळोवेळी मांडली आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
पुढे त्यांनी सांगितले की, निवडणुकांच्या काळात रोजगाराचे गाजर दाखवून तरुणांची सरकारने थट्टा केली आहे. हजारो तरुणांचे वेतन दिले जात नाही. वापरा आणि फेकून द्या अशा पध्दतीने तरुणांचा वापर केला जात आहे. ही मोठी चिंताजनक बाब आहे. गेल, आरसीफ कंपनीमध्ये तरुणांना नोकऱ्या नाहीत. नव्या येणाऱ्या प्रकल्पासह विकासाला शेकापकडून स्वागत आहे. परंतु, भूमीपुत्रांचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे. अनेक तरुण रोजगार अभावी, आणि वेतन नसल्याने आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे. ही शेकापची भुमिका आहे. शेतकरी कामगार पक्ष तरुणांच्या पाठीशी कायम आहे.
सरकारने जनसुरक्षा विधेयकाला मंजूर करून अर्बन नक्षल नावाचे गोंडस नाव दिले आहे. जनतेने न्याय मागायचा नाही. अशी भुमिका सरकारची आहे. सर्वसामान्यांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी कामगार पक्ष हे कदापी सहन करणार आहे. एक वेगळ्या भुमिकेतून काम करून लढा दिला जाणार आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका होणार आहे. या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकविला जाणार आहे. महाविकास आघाडी सोबत असणार आहे. परंतु, शिंदे गट हा एकनंबरचा शत्रू असणार आहे, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.





