। पनवेल । प्रतिनिधी ।
ज्याप्रमाणे वारकऱ्यांना आषाढी-कार्तिकीला आळंदी-पंढरीची विठुरायाच्या दर्शनाची, माऊलीची ओढ लागते, तशीच वर्षभर काम करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला याठिकाणी 2 ऑगस्टची ओढ असते, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी केले. 78 वर्षांनंतरही कुठली सत्ता नाही, कुठलीही पदं नाहीत, कुठलं प्रलोभन नाही, कुठली अपेक्षा नाही, पण शेतकरी कामगार पक्षाबरोबर आम्ही ठाम आहोत, हा निर्धार करुन याठिकाणी आलेल्या निष्ठावंतांचा सोहळा असून, याच सभेतून आगामी निवडणुकांमध्ये लाल बावट्याच्या विजयाचा निर्धार करुया, असे आवाहन बाळाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या एकंदर महाविकास आघाडीसोबतच हिंदी सक्तीच्या विरोधात ज्यांनी अतिशय ठामपणे भूमिका घेतली, मराठीच्या रक्षणाच्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही, ही भूमिका घेललेले राज ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसबोत आज उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी त्यांचे स्वागत केले.

ते पुढे म्हणाले की, पनवेल नगरीची अवस्था फार गंभीर आहे. पनवेलची जनता पाण्यावाचून तरसतेय, आणि आमचे आमदार मात्र भलतेच धंदे करीत फिरताहेत, अशी परिस्थिती आहे. पनवेलच्या जनतेने पॉपर्टी टॅक्समध्ये माफी मागितली. तर, यांनी प्रॉपर्टी टॅक्स भराच, वर दहा टक्के व्याज भरा म्हणून सांगितले. साऱ्या परिस्थितीने पनवेलकर, रायगडकर त्रासलेला आहे. आज व्यासपीठावर बघितल्यानंतर माझ्यासारख्या विरोधी पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने समाधान होत आहे. असा सभामंच भविष्यात राहिला, तर निश्चितपणाने बदल झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.







