तहसीलदारांनी आदेश देऊनही मातीचा भराव
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सध्या रेल्वेच्या कारशेडचे काम जोरदार सुरू आहे. भिवपुरी रोड ते कर्जत या दरम्यान प्रस्तावित असलेल्या रेल्वे कारशेडसाठी सुरू असलेल्या माती भरावाच्या कामामुळे उल्हास नदीकाठच्या गावांना महापुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने पावसाळ्यापर्यंत हे काम बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही, रेल्वे ठेकेदाराने कायद्याला धाब्यावर बसवत रात्रीच्या वेळी मातीचा भराव पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराविरुद्ध वावे आणि बेंडसे येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हे काम बंद पाडले आहे.
कर्जत तालुक्यात रेल्वे प्रशासनाकडून कारशेड बांधले जात आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव केला जात आहे. मात्र, हा परिसर उल्हास नदीच्या तीरावर असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याकडे लक्ष वेधत स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी कर्जतच्या तहसीलदारांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, पावसाळ्याचा कालावधी संपेपर्यंत भरावाचे काम बंद ठेवावे, असे स्पष्ट आदेश तहसीलदारांनी रेल्वे प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने आदेश देऊन तीन दिवस उलटत नाही तोच, रेल्वेच्या ठेकेदाराने अचानक पुन्हा माती भरावाचे काम सुरू केले. तहसीलदारांच्या आदेशाचे अशा प्रकारे उल्लंघन होत असल्याचे पाहून वावे आणि बेंडसे येथील ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ठेकेदार प्रशासनाच्या आदेशाला जुमानत नसल्याचे पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चालू असलेले काम तातडीने बंद पाडले. यावेळी वावे येथील शेतकरी रामदास शेलार यांनी थेट कर्जत तहसीलदारांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराची कल्पना दिली. यावेळी वावे आणि बेंडसे गावातील शेतकरी रामचंद्र कडू, अमर कडू, संतोष कडू, वैभव मराडे, रामदास शेलार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.







