| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्रात दारु महाग झाल्याने अनेक जण गोव्यातून स्वस्त दारु आणण्याचा मार्ग अवलंबू लागले आहेत. मात्र, रेल्वे पोलिसांनी अशा प्रवाशांवर वॉच ठेवून रेल्वेमार्गे दारु आणणाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. पनवेल रेल्वे स्थानकात पहाटे रेल्वे पोलिसांनी मत्स्यगंधा एक्सप्रेस मधून दारुच्या बाटल्या घेऊन आलेल्या 3 प्रवाशांची धरपकड केली आहे. तसेच त्यांच्याकडून सुमारे 32 हजार रुपये किंमतीची बेकायदेशीर दारु जप्त करुन तिघांना ताब्यात घेतले आहे.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील अंमलदार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशनवर गस्त घालत होते. यावेळी फलाट क्रं. 5 वर आलेल्या मत्स्यगंधा एक्सप्रेस मधून उतरलेल्या महेंद्र हरसुख बाई राधडिया (37), चंदन संतोष राजभर (26) आणि मोहम्मद सर्फराज मोहम्मद शफी शेख (38) या 3 प्रवाशांवर पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता सुमारे 32 हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या आढळल्या.
महाराष्ट्रात दारु महाग झाल्याने अनेक प्रवासी गोव्यातून स्वस्त दारु आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, फॉर सेल इन गोवा ओन्ली असे लिहिलेल्या मद्याच्या बाटल्या इतर राज्यात विक्री करता येत नाहीत. अशा मद्याच्या बाटल्या बाळगणे किंवा वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे पथक तसेच आरपीएफ जवानांकडून सध्या रेल्वे स्टेशनवर सतत गस्त घालण्यात येत असून, संशयास्पद प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे रेल्वेमार्गे दारु आणणाऱ्यांनी सावध रहावे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.







