नगरसेवक झाल्यावर हात आखडता; मतदारांना खुश करण्यासाठी भेटवस्तूंची रेलचेल
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
निवडणूक जवळ आली की मतदारराजा हा प्रत्येक इच्छुक उमेदवारासाठी किती महत्त्वाचा असतो, याचा प्रत्यय पनवेल महानगरपालिका हद्दीत मागील वर्षीच्या दिवाळीत आला होता. त्यावेळी निवडणुकीच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुकांनी आपल्या प्रभागातील मतदारांच्या घरी दिवाळीच्या शुभेच्छांसोबत उटण्याची पाकिटे आणि विविध भेटवस्तू पाठवून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. काही ठिकाणी तर भेटवस्तूंची चांगलीच रेलचेल पाहायला मिळाली होती.
मात्र, यंदाचे चित्र अगदी उलटे असल्याचे दिसून आले. मागील वर्षी मतदारांच्या घरी आवर्जून पोहोचणारी उटण्याची पाकिटे यंदा मात्र गायब झाली आहेत. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत निवडून आलेले नगरसेवक आणि त्यावेळी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अनेक चेहरे यांनी यंदा दिवाळीच्या निमित्ताने हात आखडता घेतल्याचे चित्र आहे. मतदारांच्या घरी साधे उटण्याचे पाकीटही पोहोचले नसल्याची चर्चा प्रभागांमध्ये रंगू लागली आहे.
निवडणुकीपूर्वी दिवाळीच्या शुभेच्छांसोबत भेटवस्तू देण्यासाठी पुढाकार घेणारे इच्छुक आता निवडून आल्यानंतर मात्र या परंपरेपासून दूर का गेले, असा प्रश्न नागरिकांकडून उपरोधिकपणे उपस्थित केला जात आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांची आठवण ठेवणारे नेते निवडणूक संपल्यानंतर दिवाळीच्या सणातही मतदारांना विसरले का, असा टोला नागरिकांमधून लगावला जात आहे.
दिवाळीला भेटवस्तू देणे ही कोणाची जबाबदारी नसली तरी निवडणुकीच्या आधी आणि नंतरच्या वागण्यात पडलेला फरक मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे यंदा पनवेलकरांच्या दिवाळीत फटाके, फराळ आणि आनंद तर होता; पण राजकीय उटण्याचा सुगंध मात्र गायब झाल्याची मिश्किल टिप्पणी ऐकायला मिळत आहे.






