कन्नडचा सुपरस्टार पुनीत राजकुमार याचे जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन पावण्याची घटना जितकी धक्कादायक आहे, तितकीच मनाला चटका लावणारी आहे. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी अत्यंत तंदुरुस्त असलेल्या स्टारचे जाणे याबद्दल अनेक पद्धतीने पाहता येते, चर्चा करता येते. तसे ते याही आधी अन्य अनेकांच्या बाबतीत घडलेले असताना होत असते. अनेकवेळा हृदयविकाराचा झटका आलेला लक्षातही येत नाही. हृदयविकार इतका धोकादायक बनतो की तो तंदुरुस्त लोकांनाही यामुळे आपला जीव गमवावा लागतो. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणे ही काही नवीन गोष्ट नाही, परंतु काहीवेळा हा हल्ला इतका धोकादायक असतो की मृत्यू एका क्षणात होतो. वाचण्याची शक्यता राहत नाही. हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा एक स्नायू आहे जो पंप म्हणून काम करतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्ताचा प्रवाह असतो. मात्र व्यायामाद्वारे स्वत:चे शरीर कमावतानाच आपल्यातील परोपकाराच्या दैवी सद्गुणांनी सर्वांच्या आयुष्याशी जोडून राहणारा असा स्टार क्वचितच पाहायला मिळतो. म्हणून त्याच्या आकस्मिक निधनाची बातमी एवढी धक्कादायक होती की कर्नाटकात संचारबंदीचे कलम लागू करावे लागले. रुपेरी पडद्यावरील आपल्या मनमोहक अभिनयाद्वारे लोकप्रियता मिळवत जनतेच्या हृदयात स्थान मिळवणारा एक उमदा स्टार अचानक पडद्यावरून एक्झिट घेतो, तेव्हा कोणालाही हळहळ वाटेल. पुनीत राजकुमार हा लोकप्रिय कलावंत होताच, शिवाय आपले आयुष्य केवळ आपल्या स्वत:साठी नाही, तर आपले आयुष्य हे इतरांसाठी आहे, हे समजून जगणारी माणसे कमीच. त्यात रुपेरी झगमगाटात, उगवत्या सूर्याला नमस्कार करणार्या जगतातील पुनीत सारखी माणसेही मुळात कमीच. म्हणून पुनीतच्या जाण्याने कन्नड सिनेसृष्टीचे नुकसान झाले आहेच, मात्र त्याच्या सेवाभावी पद्धतीने जगण्याची जाणीव तो गेल्यावर अधिक जाणवू लागली आहे. पुनीतने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केल्याने चार जणांना दृष्टी लाभली. त्याच्या वडिलांनीही ते केले होते. पुनीतने 21 सुपरहिट सिनेमे दिले, हे कौतुकास्पद आहेच, पण हे सगळे करत असताना तो तब्बल 26 अनाथाश्रम चालवायचा. त्याने सुरू केलेल्या संपूर्णत: मोफत शाळांची संख्या 46 आहे. इतकेच नाही तर 16 वृद्धाश्रम तो चालवत होता आणि सुमारे 19 गोशाळा चालवण्याचेही काम त्याने अंगावर घेतले होते. आपल्या देशात अनाथांची संख्या मोठी असते. याची त्याला चांगलीच जाणीव होती. म्हणून त्याने अठराशे मुलांचे पालकत्व स्वीकारले होते आणि त्यांच्यावर मायेची सावली धरली होती. त्याची लोकांना आपलेसे करून घेण्याची हातोटी वेगळीच होती. अत्यंत सच्च्या दिलाने तो लोकांशी जोडला जायचा. गेल्या वर्षी तो बंगलोरवरून कुमठा या छोट्या गावात सुमारे पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आला होता. कारण त्याच्या वाहनचालकाच्या मुलाचे लग्न होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींतून तो आपले असामान्यत्व दाखवत होता. म्हणूनच बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू, राजकारणातील दिग्गज आदींनी त्याच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. पुनीतच्या निधनाची बातमी देत असताना न्यूज चॅनलच्या वृत्तनिवेदिकेला रडू कोसळले आणि ती स्वत:ला सावरू शकली नाही, याचे कारण हेच आहे. अभिनेते आपल्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका करतात, पात्रे साकारतात. त्यापैकी काही पात्रांचे संवाद त्यांच्या जीवनाचे जणू सूत्र बनते आणि अशा आकस्मिक निधनानंतर ते संवाद खरे वाटायला लागतात. त्यांच्या निधनानंतर त्याने साकारलेल्या भूमिकेतील पात्राच्या तोंडी असलेला संवाद व्हायरल झाला आहे. त्यात पुनीत राजकुमार म्हणतो की, आपल्याला एकच आयुष्य लाभतं. कधी काय होईल, आज काय होईल कोणालाच माहिती नसते. उद्याची काहीही शाश्वती नसते. आपण कुठे आणि काय खातो, जेवतो हे सगळे लिहून ठेवलेले असते, जे आपल्या नशिबात आहे, ते आपण वगळू शकत नाही. खरे तर तो अभिनयाचे धडे देऊन गेलाच, त्याहून अधिक आपण कसे जगायला हवे हे जगून दाखवून गेला. ज्यांनी आपल्या उदार हातांनी पेलल्यामुळे आभाळ कोसळत नाही, असे आभाळ पेलणारे ते हात होते. त्याची स्मृती त्याच्या कार्यातून सदैव जिवंत राहील, यात शंका नाही.