| पेण | प्रतिनिधी |
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशिल पाटील यांच्या सुचनेनुसार व आमदार रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.13) सकाळी 10 वाजता पेणमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. मात्र, आयोजकांमधून जिल्ह्याचे महामंत्री वैकुंठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, मिलींद पाटील व जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष परशुराम पाटील यांची नावे हेतुपुरस्तर डावळल्याने पेण शहरात दिवसभर भाजपचा नाट्य मानापमान पहायला मिळाला. एकंदरीत गेली दोन ते तीन दिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकींवरून समाज माध्यमांवर तू-तू, मै-मै सुरू आहे. त्याचाच पुढचा अंक तिरंगा रॅलीच्या आयोजकांच्या नावाच्या यादीवरून पुन्हा पहायला मिळाला. त्यामुळे कळत-नकळत भाजपमध्ये दोन गट कार्यरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आगामी येणाऱ्या निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर हे गटातटाचे राजकारण भाजपला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. या विषयी नाराज गटातून पेण मंडळ अध्यक्षां बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.







