। तळा । प्रतिनिधी ।
मुंबई विद्यापीठाचा 58 वा दक्षिण रायगड विभागाचा युवा महोत्सव 2025 अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज ऑफ सायन्स जंजिरा, मुरुड येथे पार पडला. या युवा महोत्सवात दरवर्षीप्रमाणे रायगड जिल्ह्यातील 24 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. तळा तालुक्यातील जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात आपला सहभाग नोंदवला.
महाविद्यालयातील क्षितिजा करण हिने रांगोळी या कला प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले, तर फातिमा फटाकरे हिने मेहंदी डिझायनिंग या कलाप्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, मराठी पथनाट्य या कलाप्रकारात महाविद्यालयातील एकूण सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत ‘मीच तो’ नावाचे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या पथनाट्यात अथर्व गोडवले, मयुर जंगम, सौरभ मालुसकर, साई शिंदे, आर्यन मोरे आणि सूरज जाधव यांनी आपल्या अभिनयाचे उत्तम प्रदर्शन केले.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. अमोल निकम, डॉ. पी. बी.अभंगे, रिया राजपुरकर, डॉ. विवेक राणे, संदीप राठोड, पल्लवी भट या संस्कृतिक विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. अमोल निकम यांनी या यशाबद्दल सर्व सहभागी आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. शाहीना मिर्झा तसेच महाविद्यालय व्यवस्थापन यांचेदेखील आभार व्यक्त केले.







