| तळा | प्रतिनिधी |
आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर तळा पोलिसांकडून शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी आगामी सण शांततेत साजरे करावेत, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी उपस्थित तळावासीयांना केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी दाखल होणार आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असून ज्या ठिकाणी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणच्या पोलीस पाटील यांनी अगोदरच याची कल्पना तळा पोलीस ठाण्यात द्यावी. पोलीस हे आपले मित्र आहेत त्यांना सहकार्य करून आगामी सणाला कोणताही गालबोट लागणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी तहसीलदार स्वाती पाटील, पोलीस निरीक्षक सतीश गवई, चंद्रकांत रोडे, तळा नगरपंचायतीचे नगरसेवक, तालुक्यातील पोलीस पाटील यांसह तालुक्यातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.







