| पनवेल | प्रतिनिधी |
स्कॉर्पिओची चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने अटक केली आहे. सुरेश कालुराम उदाणी (30), रिचपाल पप्पुराम बिष्णोई (24) अशी या चोरट्यांची नावे आहे. या आरोपींनी इतर ठिकाणीदेखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असल्याने गुन्हे शाखेकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
जून महिन्यात दोन चोरट्यांनी नवीन पनवेल परिसरातून एक स्कॉर्पिओ चोरुन नेली होती. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. त्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली असता, दोघेही मूळचे राजस्थान येथील असल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले. मात्र, आरोपी वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे कठीण होत होते. दोन्ही आरोपी कल्याण-भिवंडी रोड परिसरातील टेमघर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.







