| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांचा विचार केला तर त्या जिल्ह्यातील जनतेला विश्वासात घेतलं तर उद्योगांना जमीन मिळू शकते. जेएसडब्ल्यू कंपनीच्या तिसऱ्या विस्ताराबाबत विरोधकांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांच्या आरोग्यालाही वेठीस धरले आहे. सध्या भांडवलदार बोले आणि शासन चाले अशी स्थिती असल्यामुळे सामान्य नागरिकांची परवड होत आहे. राज्याच्या दृष्टिने हे औद्योगिक प्रकल्प महत्वाचे असले तरी या प्रकल्पांच्या विस्ताराचा परिणाम जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यावर होणार असेल तर हे भविष्यासाठी निश्चितच धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाला नाही तर प्रदुषणकारी प्रवृत्तीला विरोध आहे, असे रोखठोक प्रत्यूत्तर शेकापचे अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी विरोधकांना दिले.
त्यापुढे सुरेश घरत यांनी सांगितले कि, विरोध प्रदूषणाला आहे. त्याबाबत कठोर कारवाईला आहे, प्रकल्पला नाही. कारण कंपनीच्या उद्घाटनाचा नारळ शेकापनेच फोडला होता आणि पर्यावरणपूरक विस्ताराचा नारळसुद्धा भविष्यात शेकापच फोडेल. जेएसडब्ल्यू कंपनी ही शेतकरी कामगार पक्ष सत्तेत असतानाच आली आहे. कंपनीच्या विस्ताराला शेकापने कधीच विरोध केला नाही. या तालुक्यात जेवढे प्रकल्प आले त्यात स्थानिकांना जर रोजगार मिळाला असेल तर तो फक्त शेकापमुळेच मिळाला आहे, हे सर्वांनाच ज्ञात आहे. रोजगार प्रत्येकालाच हवा आहे. पण कंपनीने रायगडचे भोपाळ बनवता कामा नये. कंपनीमुळे होणारे प्रदूषण सर्वजण पाहत आहेत. ज्यांना नोकरी मागत आहोत त्या स्थानिक नागरिकांची पुढची पिढी जन्माला तर यायला हवी, असा प्रश्नही घरत यांनी उपस्थित केला.
अलिबागचे आर्थिक उत्पन्न पर्यटनावर अवलंबून आहे. प्रदूषण वाढले तर काय होईल सांगायला नको. कंत्राट मिळवून काहीजण गब्बर होतील पण हजारो लोकांचा रोजगार जाईल. त्यामुळे शेकापचा विरोध म्हणून उगाच ओरडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, प्रकल्प निश्चितच हवा आहे. पण कंत्राट मिळतील म्हणून नाही तर लोकांचे त्यातून भले झाले पाहिजे. या अगोदरच्या प्रकल्पांना आमचा विरोध आणि तुमचा पाठिंबा असे चित्र रंगवून काहीच उपयोग नाही. मागील काही वर्षात तालुक्यात कागदावर असे किती प्रकल्प आले आणि तुमच्या नाकासमोरून गुजरातला किती गेले हे संपूर्ण देशाला माहिती आहे.
प्रदुषणाबाबत तडजोड नाहीच
अलिबागमध्ये आरसीएफ कंपनीचा विस्तार होत आहे. पण कंपनी पर्यवरणपूरक दृष्टिकोनातून हा विस्तार योग्य पद्धतीने करीत आहेत.त्या प्रकल्पाचे आम्ही स्वागतच केले. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीने प्रदूषणाबाबत तडजोड करू नये. 100 टक्के स्थानिकांना कायमस्वरुपी नोकरीत प्राधान्य देण्याबाबत लिखित करार करावा.
तालुक्यातील सर्वांकारिता हॉस्पिटल माफक दरात खुले असेल व स्थानिक लोकांना जे थेट कंपनीतील प्रदूषणाच्या कार्यक्षेत्रात येतात, त्यांना पूर्णतः मोफत आरोग्य सेवा द्यावी.







