| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कचरा संकलनासाठी श्रीवर्धन तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीत जानेवारी 2025 साली प्रत्येकी एक इलेक्ट्रॉनिक घंटागाड्या (ई-रिक्षा) रायगड जिल्हा परिषदेने पुरवल्या आहेत. ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेत 14 वा वित्त आयोग आणि नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून ई-घंटागाड्या खरेदी केल्या.
तालुक्यातील रानवली, भोस्ते, वाळवटी, शेखाडी व बोर्लीपंचतन या ग्रामपंचायतीसाठी ई-घंटागाड्या देताना जिल्हा परिषदेने तालुक्याची भौगोलिक परिस्थिती न बघता ई रिक्षा दिल्याचे निदर्शनास येते. अनेक ग्रामपंचायतींचे कचरा डेपो हे डोंगर वाटेवर आहेत. इलेक्टॉनिक रिक्षांची कुवत बघता या रिक्षा चढावात योग्य वेगाने चढू शकत नाहीत परिणामी, चालकाला कचऱ्याने भरलेली ई-घंटागाडी त्याच मार्गाने ग्रामपंचायतीच्या आवारात आणून उभी करावी लागते. वजनाने हलकी व चालकासह एका सफाई कर्मचार्याला केबीनमध्ये बसण्यास अपुरी जागा, कचरा संकलन करण्यासाठी अपुरी जागा अशा या त्रुटींमुळे ई-घंटागाडी ग्रामपंचायतींच्या आवारात बंद अवस्थेत दिसत आहेत. ई-घंटागाड्या करीता बॅटरी चार्जिंग सुविधा, दुरुस्ती आणि देखभालीसाठी आवश्यक साधने ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाहीत. ई-रिक्षा ग्रामपंचायतीना दिल्यावर त्यांच्या वापराबाबत आणि देखभाल बाबत जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ई- रिक्षा शोभेची वस्तू झाली आहे.







