। नागोठणे । प्रतिनिधी ।
वाकण – पाली मार्गालगत असलेल्या अंबा नदी किनारी जंगली पीरच्या मागील बाजूस गुरुवारी (दि.28) सायंकाळी एक मृतदेह आढळून आला. नागोठण्यातील एनव्हीएसएसआर या रेस्क्यू टीमच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगली पीरच्या मागील बाजूस अंबा नदीच्या पात्रात एक मृतदेह असल्याची माहिती नागोठणे पोलिसांना मिळाली. नागोठणे पोलीस ठाण्यातून पोलीस हवालदार स्वप्नील भालेराव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ही माहिती वरिष्ठाना दिली. नागोठण्यातील एनव्हीएसएसआर टीमला पाचारण करण्यात आले. या टीममध्ये अखिल शेलार, सदस्य सूरज राणे, निखिल शेलार, सनिस मिणमिणे, साहिल राणे, नीरज बडे, कल्पेश बडे, दीपेश राणे, दिनेश घासे, मनोज माळी, सुजल अडसुळे, प्रथमेश शेलार यांचा समावेश असून, यावेळी पाली व नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. या टीमने मृतदेहाला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाहेर काढले. जंगली पीर जवळील अंबा नदीच्या पात्रात सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटली असून, ही व्यक्ती शिलोशी आदिवासी वाडी ता.सुधागड येथील रहिवासी असून, या व्यक्तीचे नाव मनोहर कोळी(30) असे आहे. या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.







