विजेत्यांना रोख बक्षिसांचे फक्त आश्वासन
| रायगड | प्रमोद जाधव |
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत मॅरेथॉन स्पर्धा अलिबागमध्ये आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातून जवळपास शंभरहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षीस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, क्रीडा अधिकाऱ्यांकडून विजेत्या खेळाडूंची घोर फसवणूक करण्यात आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा, ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत क्रीडा व खेळाचे महत्त्व पोहोचविणे, निरोगी राहण्याचा संदेश जावा, युवक-युवतींमध्ये क्रीडाविषयक वातावरण तयार व्हावे, तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन व जतन व्हावे या हेतूने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शुक्रवारी (दि.29) सकाळी अलिबागमध्ये मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. 15 व 17 वर्षांखालील मुले व मुली, खुला गट पुरुष व महिला वयोगटासाठी तीन किलोमीटर धावण्याची ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या खेळाडूंना तीन हजार, दोन हजार व एक हजार असे रोखीत बक्षीस ठेवण्यात आले होते. त्याची जाहिरातही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. रोखीत बक्षीस मिळणार म्हणून जिल्हाभरातून शंभरहून अधिक खेळाडू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले. परंतु, रोखीत बक्षीस देण्यात आले नाही. त्यामुळे विजेत्या खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना जाब विचारला. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत खेळाडूंशी बोलणे टाळले. क्रीडा अधिकाऱ्यांकडून खेळाडूंची हेळसांड होण्याबरोबरच फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तीन गटातील एकूण 18 विजेत्यांची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या या प्रकाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
पूर्णवेळ क्रीडा अधिकाऱ्यांचा अभाव
जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून रवींद्र नाईक हे कार्यरत होते. त्यांच्या जागी माणगावचे तालुका क्रीडा अधिकारी यांच्याकडे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. त्यानंतर आता त्या पदावरून त्यांना काढून त्यांच्या जागी पेणचे तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्याकडे अतिरिक्त कारभार एप्रिल महिन्यापासून सोपविण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पूर्णवेळ जिल्हा क्रीडा अधिकारी यांची नियुक्ती न केल्याने त्यांच्या जागी तालुका क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत क्रीडा विभागाचे कामकाज चालविले जात आहे. जिल्ह्याला गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ क्रीडा अधिकारी नाहीत, ही मोठी चिंतेची बाब आहे.
तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची फक्त तीन पदे मंजूर
प्रकाश वाघ यांच्याकडे पेणचे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कारभार आहे. त्यांच्याकडे पेणबरोबरच पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, म्हसळा, श्रीवर्धन या सहा तालुक्यांचा क्रीडा अधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार आहे. रोहा तालुका अधिकारी म्हणून अंकिता मयेकर या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे रोहासह अलिबाग व मुरूड तालुक्याचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. तसेच राजेंद्र अतनुर यांच्याकडे माणगावचे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कारभार असून, सध्या महाड, पोलादपूरचे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून अतिरिक्त भार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तीन तालुका अधिकारी जिल्ह्यात कार्यरत असून, 12 पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अलिबागमध्ये मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी शंभरहून अधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सुरुवातीला जाहिरातीत रोखीत बक्षीस ठेवण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये सुधारणा करून रोखीत बक्षीस देण्याचा मुद्दा काढण्यात आला. ती जाहिरात खेळाडूने पाहिली नसल्याने त्यांना गैरसमज निर्माण झाला. रोखीत बक्षीस देण्याबाबत कोणतीही आर्थिक फसवणूक झाली नाही.
प्रकाश वाघ,
प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी







