अखेर शमरॉक एंटरप्रायजेसचे मालक व साथीदारांवर होणार गुन्हा दाखल
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगडच्या सुधागड तालुक्यातील शेतकरी पांडुरंग लिंबाजी तेलंगे व इतर शेतकरी यांची मे. शमरॉक एंटरप्रायजेसचे मालक कल्पेश खोखानी व त्याचा साथीदार अशोक भारती यांनी फसवणूक करून अपरिमित नुकसान केले होते. त्यांच्यावर उच्च न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत, असे शेतकरी पांडुरंग लिंबाजी तेलंगे व इतर शेतकरी यांनी सांगितले.
या फसवणूक संदर्भात पांडुरंग लिंबाजी तेलंगे यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे फौजदारी रीट याचिका क्र. 195/2022 दाखल केली होती. न्यायालयाने तक्रारदार तेलंगे यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय, पाली-सुधागड येथे तक्रार करण्यास सूचित केले होते. त्याप्रमाणे त्यांनी फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 37/2024 दाखल केला होता. याप्रकरणी सुनावणी होऊन पांडुरंग लिंबाजी तेलंगे यांचे मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. आर.एन. कच्छवे यांनी बाजू मांडली असता न्यायालयाने याप्रकरणी उपरोक्त आरोपींविरूध्द गुरुवारी (दि.14) पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच न्यायालयासमक्ष सदर तपासासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, पांडुरंग लिंबाजी तेलंगे यांनी त्यांची पत्नी कल्पना लिंबाजी तेलंगे यांचे नावे अप्पर जिल्हा अधिकारी रायगड, अलिबाग येथे अपील दाखल असताना त्यांच्यावतीने ते चालविण्यासाठी दि. 09/03/2012 रोजी अशोक श्रीपत भारती यास पत्नी कल्पना पांडुरंग तेलंगे, मधुकर राजाराम खंडागळे, दोघे रा. वऱ्हाड, जांभुळपाडा, ता. सुधागड, जि. रायगड, महादेव सखाराम देशमुख, बाळू विठ्ठल देशमुख, काळुराम हरी पुरी, तिघेही रा. हेदवली, पो. जांभुळपाडा, ता. सुधागड, जि. रायगड व पांडुरंग बाळू दळवी, रा. कानसळ, ता. सुधागड, जि. रायगड या सर्वांनी अशोक श्रीपत भारती यास कुळमुखत्यारी म्हणून नेमणूक केली व हेदवली येथील गट नं. 219, 228 व 229 तसेच कानसळ येथील गट नं. 78, 79/1 अ, 80, 59/1, 54 या जमिनी पूर्वी उपरोक्त शेतकऱ्यांच्या मालकीच्या होत्या. त्या जमिनी परत मिळणेकामी मा. जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अर्ज केला होता. त्या कारणाकरिता या जमिनीसंदर्भात शेतकऱ्यांच्या वतीने विविध कामांकरीता मुखत्यारनामा सह्या करून नोटरी करून दिला होता. सदर कुलमुखत्यार नामाचा गैरफायदा घेऊन पांडुरंग लिंबाजी तेलंगे व इतर शेतकऱ्यांना कसलीही माहिती न देता परस्पर मेसर्स शमरॉक एंटरप्रायजेसचे मालक कल्पेश खोखानी यांच्याविरूद्ध असलेला दावा परस्पर शेतकऱ्यांच्या वतीने सह्या करून तसेच कोऱ्या कागदावर सह्या घेऊन परस्पर ते दावे मेसर्स शमरॉक एंटरप्रायजेसचे मालक कल्पेश खोखानी व त्यांचे सहकारी उचलून घेऊन गैरमार्गाने तक्रारदार तेलंगे व इतर शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे.
याबाबत दि. 04/03/2020 रोजी तेलंगे यांची पत्नी कल्पना पांडुरंग तेलंगे यांनी कल्पेश खोखानी व त्यांचे सहकारी तिचे असलेले अपिलाबद्दल काय चालले आहे ते कळविण्यासंबंधी पत्र लिहिले, पण त्याने कसलीच दखल न घेतल्याने तेलंगे यांच्या पत्नीने वकील शमीका शिवाजी दळवी यांच्यामार्फत आरोपीस नोटीस पाठविली व खुलासा मागितला. मात्र, त्याने त्याची कसलीच दखल घेतली नाही. शेवटी तेलंगे यांनी संबंधित रायगडचे अप्पर जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन माहिती काढली असता कल्पेश खोखानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमताने परस्पर तक्रारी मागे घेतल्याचे माहिती पडले व अप्पर जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या आदेशात दि. 13/07/2016 च्या तडजोड पुरसीसप्रमाणे सदर प्रकरण निकाली काढण्यात आल्याचे माहिती पडले. अशाप्रकारे अशोक श्रीपत भारती व कल्पेश रामेशचंद्रन खोखानी यांनी तेलंगे यांची पत्नी व इतर सहा जणांचा विश्वासघात व फसवणूक करून गैरमार्गाने अपरिमीत नुकसान केले आहे. कल्पेश खोखानी व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या उपरोक्त गुन्ह्यांची न्यायालयाने दखल घेऊन पांडुरंग लिंबाजी तेलंगे यांना न्याय दिला आहे. याप्रकरणी त्यांनी हे प्रकरण लावून धरून तडीस नेल्याबद्दल त्यांचे वकील ॲड. आर.एन. कच्छवे यांचे विविध शेतकरी संघटना व नागरिकांच्यावतीने कौतुक केले जात आहे.







