। नागोठणे । प्रतिनिधी ।
मुंबई- गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीच्या जवळच अपघात झाल्याची घटना रविवारी (दि.7) सकाळच्या सुमारास घडली आहे. या अपघातामधील टेम्पो महामार्गावर उलटल्यानंतर चालक टेम्पो मध्ये अडकला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड बाजूकडून पेण बाजूकडे जाणाऱ्या टेम्पोला अपघात झाला. सुकेळी खिंडीच्या जवळून वाहणाऱ्या कालव्याच्या पुलावर हा टेम्पो उलटला. त्यानंतर लगेचच त्याच वेळी टेम्पोच्या बाजूने श्रीवर्धनहून बोरिवलीकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी बस टेम्पोला घासल्याने त्या बसचेही नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच नागोठण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्यासह नागोठणे पोलीस ठाणे व ऐनघर महामार्ग मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी टेम्पो चालकाला टेम्पोतून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर टेम्पो चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. टेम्पो चालक काही प्रमाणात जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस व महामार्ग पोलिसांच्या ऐनघर मदत केंद्राच्या पोलिसांनी सहकार्य केले.







