| रायगड | प्रतिनिधी |
वादळी वारा आणि पावसामुळे रायगडातील सर्वच बंदरांस धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा फडकवण्यात आला आहे. यामुळे गेट वे एलिफंटा, गेट वे – जेएनपीए, मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.
गणेशोत्सव साजरा करून हजारो चाकरमानी मुंबई, ठाणे गाठत आहेत. त्यामुळे पेण, वडखळ तसेच पनवेलच्या तोंडावर अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच आता रायगड मुंबईला जोडणारा सागरी मार्गदेखील ठप्प पडल्याने या मार्गावरील पर्यटक तसेच प्रवाशांनी रस्ते मार्गाने ये-जा सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडत असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
गेल्या दोन महिन्यांत सात वेळा या मार्गावरील जल वाहतूक कोलमडली असून, हजारो पर्यटकांसह नोकरीनिमित्ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. त्यातच बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा मागील दोन महिन्यांत सातव्यांदा विविध बंदरात लावण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेट वे ऑफ इंडिया-एलिफंटा, गेट वे-जेएनपीए सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारपासून बंद करण्यात आली असल्याची माहिती गेट वे मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी इक्बाल मुकादम यांनी दिली. तर मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या दरम्यानची सागरी वाहतूकही शनिवारपासूनच बंद करण्यात आली असल्याची माहिती भाऊचा धक्का-मोरा विभागाचे बंदर निरीक्षक सुशील साटेलकर यांनी दिली.







