| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून थायलंड येथील गणेशभक्त येत आहेत. या थायलंडच्या गणेशभक्तांसोबत येथील व्यावसायिक तरुण मनोज मोरे हे अस्खलितपणे थाई भाषेतून संवाद साधत आहेत. हे पाहून सारे जण अचंबित होत आहेत. ते मागील अनेक वर्षांपासून थाई भाषेचा अभ्यास करत आहेत. तसेच अनेक वेळा थायलंड येथे देखील जाऊन आले आहेत. त्यामुळे थाई भाषा त्यांना बोलता व वाचता येते.
थायलंड येथील नागरिकांचा मास्टर बेस्ट यांचा एक ग्रुप, ज्यामध्ये जवळपास अडीचशे गणेशभक्त दरवर्षी मुंबई येथे गणेशोत्सवासाठी येतात. अनंत चतुर्दशीनंतर ते पालीला बल्ल्ळेश्वरच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. मोरे यांना थाई भाषा येत असल्यामुळे ते या थायलंड मधील गणेश भक्तांसोबत अतिशय उत्तमपणे संवाद साधतात, त्यांना विविध माहिती पुरवितात व सहकार्य देखील करतात. थायलंडमधील या गणेशभक्तांना देखील येथे आल्यावर मोरे यांच्यासोबत थाई भाषेतून संवाद साधल्यामुळे खूप काही गोष्टी समजतात आणि येथील संस्कृती आणि इतर बाबीं बाबत अधिक जाणून घेता येते त्यामुळे तेही खूप खुश असतात.







