। नेरळ। प्रतिनिधी ।
माथेरान घाटात गेल्या एक महिन्यात ही तिसरी घटना घडली आहे. आज पहाटे सोमवारी (दि.15) घाटात दरड कोसळल्याने एसटी बस व माथेरानकडे जाणाऱ्या टॅक्सी घाटात अडकून पडल्या. पहाटे दूध व्यवसायिक व टॅक्सी चालकांनी ही घटना पाहून स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळीच मलबा हटवून वाहतूक सुरळीत सुरू केली.
कर्जत तालुक्यातील मुसळधार पावसामुळे पहाटे साडेचार वाजता नेरळ–माथेरान घाटातील जुमापट्टी येथील नांगरखिंड भागात डोंगराचा काही भाग खचून रस्त्यावर माती व दगड कोसळले. त्यामुळे घाटमार्ग काहीकाळ पूर्णपणे बंद झाला होता. याबाबत माथेरान अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी सदर बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधितांना कळविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक टॅक्सी चालक मालक संघटनांनी ही माती जेसीबीच्या साह्याने हटवून घाट रस्ता मोकळा करून दिल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. “दरड कोसळली तेव्हा जर रस्त्यावर वाहनं असती तर मोठी दुर्घटना घडली असती,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली. विशेष म्हणजे, माथेरान घाटात दरड कोसळण्याची ही मागील महिनाभरातील तिसरी घटना समोर आली आहे, या घाट रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.







