| उरण | प्रतिनिधी |
मुंबईजवळ वसलेला उरण तालुका आता भोपाळच्या पूर्वसूचक स्थितीत आहे. या ठिकाणी ओएनजीसी, बीपीसीएल, वीज प्रकल्प आणि अनधिकृत यार्डमध्ये हजारो टन ज्वलनशील रसायने व तेल साठवले जात आहे. या साठ्यांवर नजर ठेवणारे अधिकारी, तहसीलदार, स्थानिक सरपंच, ग्रामसेवक आणि राजकीय नेते सगळे हातात हात घालून बसले आहेत. त्यामुळे उरण तालुका हा गॅसने भरलेला फुगा असून पैसा, ठेके, दलाली याच्यामध्ये नागरिकांचा जीव किती महत्त्वाचा आहे, हे त्यांना दिसत नसल्याची चर्चा उरणकरांमध्ये रंगत आहे.
उरण हे आज गॅसचा फुगा बनलेले शहर आहे. या ठिकाणी लाखो लिटर तेल, टनावारी वायू व रासायनिक पदार्थ साठवले जात आहेत. तसेच उरणमध्ये असंख्य अनधिकृत यार्ड असून येथे सुरक्षा उपाययोजना देखील अल्पस्तरीय आहेत. जर अशीच बेफिकिरी सुरू राहिली, तर भोपाळपेक्षाही महाभयंकर मानवी संहारक दुर्घटना घडेल, अशी भीती जाणकारांकडून वर्तविली जात आहे. कारण या आधी 2019 मधील गॅसगळतीत चार कामगार जिवंत जळून गेले होते. तसेच, सीआयएसएफचे जवान मरण पावले होते. या गॅस गळतीमुळे नागाव, म्हातवली परिसर हादरला होता. त्याच्या ज्वाळा समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचल्या. परंतु, त्यावेळी एका अधिकाऱ्यावरही कारवाई झाली नाही. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी आग लागून दोन कामगार जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा 8 सप्टेंबर रोजी आग लागली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू देखील झाला होता.
यावेळी उरणकरांनी ठाम इशारा दिला आहे की मस्तवाल अधिकाऱ्यांना तुरुंगात टाका, हलगर्जी ठेकेदारांचे परवाने रद्द करा, गप्प बसणाऱ्या ग्रामपंचायती व राजकीय नेत्यांचा मुखवटा उघडा पाडा. जर हे झाले नाही, तर उरण भोपाळपेक्षा भयंकर नरसंहाराचा सामना करावा लागेल. आज उरणची घटना फक्त अपघात नाही, हा जनता आणि प्रशासनावरील विश्वासघात आहे. सरकार, अधिकारी, ठेकेदार आणि राजकारणी जेव्हा आपला जीव महत्त्वाचे मानत नाहीत, तेव्हा उरणकरांचा रोष उग्र होईल, असा इशारा देण्यात येत आहे.







