| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील जेएनपीटी परिसरात तब्बल 12 हेक्टर क्षेत्रावर एलपीजी व द्रवरूप इंधन साठवण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पात 1,32,000 घनमीटर क्षमतेचा एलपीजी टर्मिनल, 3,18,000 घनमीटर क्षमतेचे द्रवरूप पेट्रोलियम संचय टाकी, तसेच 35,000 मेट्रिक टन क्षमतेचा एलपीजी बॉटलिंग प्लांट उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, स्थानिक तसेच परिसरातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ पेट्रोल, डिझेल व नाफ्ता नव्हे, तर विमान इंधनासह तब्बल 101 प्रकारची द्रवरूप इंधने साठवण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई व बंदर परिसरातील औद्योगिक व व्यावसायिक अर्थकारणाला मोठी गती मिळणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे वाहतुकीवर ताण वाढण्याची शक्यता आहे. सध्या जेएनपीटी मार्गावर दररोज सुमारे 25 हजार वाहने ये-जा करतात. नव्या प्रकल्पामुळे एलपीजी व द्रवरूप इंधन वाहून नेणाऱ्या टँकर व कंटेनर वाहतुकीत वाढ होणार असून, त्यामुळे उरण-पनवेल-नवी मुंबई परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण पडणार आहे.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर हलक्या व अवजड वाहनांची वर्दळ आणखी वाढणार असल्याने योग्य नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने मध्य प्रदेश व पश्चिम भारतातील राज्यांना एलपीजी व इंधन पुरवठा करणार आहे. एजिस व्होपॅक टर्मिनल्स लिमिटेड या आघाडीच्या कंपनीचा हा जेएनपीटीतील दुसरा प्रकल्प असून, 17 जुलै रोजी सीआरझेड प्राधिकरणाने त्याला हिरवा कंदील दिला आहे.







