मोठ्या माशांचे दर आवाक्याबाहेर
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
पितृपंधरवड्यात मांसाहार वर्ज्य असल्याने मासळीला मोठी पसंती असते. परंतु, मोठ्या व चवदार माशांचे दर आवाक्यात नसल्याने खवय्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. तरीदेखील रेवदंडा हायस्कूल शेजारी भरणाऱ्या मासळी बाजारात बुधवारी (दि.17) ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
कोकणातील मासळी ही पर्यटक आणि खवय्यांसाठी नेहमीच आकर्षणाचा विष असते. पावसाळ्यामुळे मागील काही दिवस मासळीवर परिणाम झाला होता; मात्र, आता परतीचा पाऊस ओसरत असल्याने मासळीचे आगमन थोडेफार वाढले आहे. त्यामुळे कोळी व महिला मच्छी विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसू लागले आहे.सध्या पारंपारिक आणि पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाली असली तरी मासळी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. परिणामी, मासळींचे दर अजूनही कमी झाले नाहीत. काहीजण पितृपंधरवड्यात मांसाहार खात नाहीत. परंतु, त्यांची मासळीला मोठी पसंती असते. सध्या मासळीची आवक कमी असल्यामुळे दरांच्या बाबतीत मात्र खवय्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. त्यातच बाजारपेठेतील मुख्य मासळी बाजारात रेवदंडा बंदरावरून आणलेली मासळी किलोला 50 ते 100 रुपये जास्त दराने विकली जात होती. त्यामुळे दर वाचवण्यासाठी अनेक ग्राहक थेट रेवदंडा हायस्कूलजवळील मासळी बाजारात गर्दी करत होते. कारण बंदरावर उतरलेली मासळी त्याचठिकाणी विकली गेल्याने तिचा दर बाजारापेक्षा स्वस्त मिळतो. त्यामुळे उघड्यावर भरणाऱ्या रेवदंडा हायस्कुलजवळील बाजारात खवय्यांचा मोठा जमाव दिसून आला.
पितृपक्षामुळे मांसाहार वर्ज्य असला तरी कोकणात मासळीची चव चाखण्यासाठी स्थानिकांसोबत पर्यटकांचीही मोठी गर्दी होत आहे. दर कडाडलेले असले तरी चवदार मासळीची चाहूल लागली की खवय्ये मागे हटत नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे बुधवारी या ठिकाणी खवय्यांची मासळी खरेदीसाठी झुंबड पडलेली.
मासळी प्रकार दर
छोटी सुरमई 200 रुपये किलो
मोठी सुरमई 600 रुपये किलो
बांगडा 80 रुपये किलो
सौंदाळे 250 रुपये किलो
छोटा सरंगा 250 रुपये किलो
मोठा सरंगा 600-700 रुपये किलो
कोळंबी 350 रुपये किलो
टायनी कोळंबी 500 रुपये किलो
छोटे पापलेट 450 रुपये किलो
मोठे पापलेट 1200 रुपये किलो







