दोन दारूचे अड्डे पेटविले
| रोहा | प्रतिनिधी |
तालुक्यातील ग्रामीण भागात विशेषतः जंगल भागात बेकायदेशीर गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या राजरोसपणे पेटत आहेत. या विषारी गावठी दारूच्या धंद्यांचा नायनाट करण्यासाठी रोहा पोलिसांनी जणुकाही चंग बांधत कारवाईला तीव्र गती दिली आहे. तीन दिवसांपूर्वी करविणे येथील घनदाट जंगलात असणाऱ्या टिटवी जंगल भागात धाड टाकून जवळपास अडीच लाख रुपये किंमतीची गावठी दारू नष्ट करुन हातभट्ट्यांचे साहित्य जाळून खाक केले होते. याच धर्तीवर गुरुवार (दि.18) रोहा पोलिसांनी पुन्हा एकदा धाडस्त्राची मालिका सुरु ठेऊन बेलवाडी येथे केलेल्या कारवाईत 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचा माल नष्ट करुन हातभट्ट्यांचे अड्डे जाळून खाक केले. या हातभट्ट्या चालविणाऱ्या दोघांविरोधात कायदेशीर कारवाई केली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाई बद्दल जनतेतून विशेषतः ग्रामीण भागातून अभिनंदन होत आहे.
रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे बेलवाडी गावचे हद्दीत जंगल भागात पाण्याच्या ओहळा जवळ गावठी हातभट्टीची दारू तयार करुन आजूबाजूच्या परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या हातभट्ट्या चालविणाऱ्या दोघांविरोधात कायदेशीर कारवाई केली. सुनील होगाडे (25 ), गणेश होगाडे (24) हे दोघे मिळून आल्यानंतर त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली आहे. सदर भट्टीचा माल, नाशवंत व डोंगरात दरी खोऱ्यात अवघड व वाहतुकीस अवजड असल्याने दोन पंचा समक्ष तोडून फोडून पोलिसांनी नष्ट केला. पोलीस अधिक्षक अंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांचे आदेशानुसार उप अधीक्षक प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. मारुती पाटील यांच्या नेतृवाखाली सुनिल सकपाळ, मनोहर शिरतार, रिया जाधव, अमित चाळेकर, गणेश ढेरे, सूरज भोईर, दीपक गाडेकर, कांचन भांड या पथकाने कारवाई केली.
मुदेमाल जप्त
दारू पाडण्यासाठी लागणारे रसायन, लाकडे, भांडी व प्लास्टिकचे सहा पिंप, दोन लोखंडी पिंप त्यामध्ये दारू तयार करण्यासाठी एकूण 1 लाख 12 हजार रु. किंमतीचे 16 हजार लिटर रसायन, दोन हजार रुपये किंमतीचा प्रोव्हेशनचा माल असा एकूण 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.







