| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सर्व रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत शासन कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे करीत नाही. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी शासनाला पैसे देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कर्जत तालुक्यात भीक मागो आंदोलन केले. मनसेच्या वतीने वाहनचालक यांच्याकडून पैसे मागून जमलेले पैसे सार्वजनिक बांधकाम खात्याला सुपूर्द केले.
कर्जत तालुक्यातील रस्त्याच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिकेत पहायला मिळाली. मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कर्जत तालुका अध्यक्ष सकाळी नेरळ आणि नेरळ परिसरामध्ये साई मंदिर पेशवाई मार्ग येथे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर मोठे आंदोलन केले. उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरले आहेत, आंदोलन मागे घ्या, अशा आशयाची पत्रे दिली गेली होती. तरीही मनसेने प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास न ठेवता थेट रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली. कर्जत शहरात मनसे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून खड्डे दुरुस्त करा नाहीतर खुर्य्या रिकाम्या करा जनतेला दिलासा द्या अन्यथा प्रशासन जागे करा अशा घोषणा देण्यात आल्या.
रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि जिल्हा सचिव अक्षय महाले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. मनसेच्या निवेदनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन स्वतंत्र पत्रे पाठवून, पावसामुळे खड्डे वारंवार तयार होत असल्याचे सांगितले होते. तसेच दोनदा खड्डे भरण्यात आल्याचे व पाऊस थांबताच रस्ते पुन्हा सुस्थितीत केले जातील असे नमूद केले होते. आंदोलन मागे घ्यावे अशी विनंतीही करण्यात आली होती. परंतु कार्यकर्त्यांनी फक्त कागदावर नकोत प्रत्यक्ष रस्त्यांवर बदल हवा अशी भूमिका घेतली. रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघात होत असल्याने सर्वसामान्य नागरिकही आंदोलनात सहभागी झाले.आंदोलन दरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जत तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. फक्त पत्रं काढून जबाबदारी टाळली जाते. जनतेच्या जीवाशी खेळणारे खड्डे आम्हाला मान्य नाहीत. जर तातडीने दुरुस्तीचे ठोस काम झाले नाही, तर मनसे आणखी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल आणि प्रशासनाला जबाबदार धरेल असा इशारा रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी आंदोलनावेळी दिला.







