। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा फेज-2 मधील असावरी हाऊसिंग सोसायटीमध्ये आईसह राहणाऱ्या तमन्ना मोफीजुल शेख या (17) मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे तमन्ना हिची हत्या तिच्या मावशीच्या पतीनेच केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार तळोजा पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मोहम्मद अयुब शाहीद मिस्त्री (44) असे असून, तो मुळचा पश्चिम बंगालमधील आहे. सध्या तो उल्हासनगर कॅम्प-5 मध्ये राहत असून, तो जीन्स तयार करणाऱ्या कारखान्यात काम करत होता. विशेष म्हणजे तो मृत तमन्ना शेख हिच्या आईच्या बहिणीचा पती आहे. या दोन्ही कुटुंबांमध्ये काही दिवसांपासून आर्थिक वाद सुरु होते. याशिवाय तमन्ना हिचे आपल्या मुलासोबत लग्न व्हावे अशी मोहम्मद अयुब याची इच्छा होती. मात्र, तमन्ना हिला दुसरीकडून लग्नासाठी स्थळ येत असल्यामुळे ती आपल्या मुलासोबत लग्न करण्यास नकार देईल, अशी त्याला शंका होती. या कारणावरुन मोहम्मद अयुब याने तमन्ना हिला समजावण्यासाठी तळोजा येथील तिच्या घरी गेला होता. तमन्ना हिची आई सकाळी कामावर गेल्याने तमन्ना घरामध्ये एकटीच होती. यावेळी तमन्नासोबत वाद झाल्यानंतर मोहम्मद आयुब याने संतापाच्या भरात प्रथम कुकरने तिच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर धारदार सुरीने भोसकून तिची हत्या केल्यानंतर त्याने पलायन केले. सायंकाळच्या सुमारास तमन्नाची आई घरी आल्यानंतर तिला घरामध्ये तमन्ना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आली. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करुन या गुह्याचा तपास करण्यासाठी तांत्रिक तपास पथक, सीसीटीव्ही तपास पथक, आरोपीचा मागोवा घेणारे पथक, घटनास्थळ तपास पथक आणि एक फॉरेन्सिक पथक स्थापन केले होते. या तपास पथकांनी केलेल्या तपासात मृत तमन्ना हिचा नातेवाईक मोहम्मद अयुब त्यांच्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा उल्हासनगर येथून आरोपी मोहम्मद अयुब याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने तमन्ना हिची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती ‘तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांनी दिली. या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी नवी मुंबई पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते (परिमंडळ-3, पनवेल), पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे, खारघर विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम आदींनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.







