| पनवेल | वार्ताहर |
महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून मोटारसायकलवरून आलेले दोन चोरटे पसार झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. भारती दवे (63) या साईनगर रोड, पनवेल येथे राहतात. त्या येथील सहस्रबुद्धे हॉस्पिटलकडून साईनगर रोडने घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून दुचाकीवरून ते भरधाव वेगात पसार झाले. दरम्यान, त्यांनी आरडाओरडा केला, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर भारती दवे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा नोंद केला आहे.






