| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील वडाळे तलाव परिसरात वेगाने गाडी चालवणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, दुचाकींचे स्टंट करणारे अशा रोड रोमियोंना उमेश इनामदार यांच्या प्रयत्नातून पोलीस प्रशासनाकडून चांगलीच चपराक बसवली आहे. या रोड रोमियोंकडून दंड वसूल करत काहींना कान पकडून माफी मागायला लावली.
शहरातील वडाळे तलाव परिसरात पनवेल आणि आसपासचे नागरिक विरंगुळा म्हणून तसेच मॉर्निंग वॉकसाठी फिरायला येत असतात. याच ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय देखील आहे. या भागात रोड रोमियोंचा वावर वाढला होता. वेगाने गाडी चालवणे, जोराने हॉर्न वाजवणे, स्टंट करणे आणि मुलींची छेडछाड असे प्रकार वाढले होते. यामध्ये अल्पवयीन युवकांची संख्या जास्त होती. याबाबतची तक्रार अनेकदा ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग करत होते. तेव्हा इनामदार यांनी या बाबीकडे लक्ष टाकले. त्यांनी पोलीस प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याची विनंती केली. तेव्हा पोलीस प्रशासनाचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शाकीर पटेल यांच्यासहीत उमेश इनामदार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा काही युवक वेगात गाडी चालवताना, गाड्यांचे स्टंट करताना तसेच हॉर्न जोरात वाजवताना आणि दुचाकीवर ट्रिपल सीट आढळून आले. पोलीस प्रशासनाने लागलीच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर काहींना कान पकडून माफी मागायला लावली. या कार्यवाहीमुळे अशा रोड रोमियोंना आळा बसणार असून, ही कारवाई म्हणजे चपराक असल्याचे बोलले जात आहे.




