| उरण | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय सागरकिनारा स्वच्छता दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या भारतातील निवासी प्रतिनिधी डॉ. ॲजेंला लुसिगी यांनी रायगड जिल्ह्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भारताच्या किनारी समुदायांची हवामान लवचिकता वाढवणाऱ्या विविध प्रकल्पाचा आढावा घेतला.
भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील भारताच्या किनारी समुदायांची हवामान लवचिकता वाढवणाऱ्या विविध प्रकल्पांना ग्रीन क्लायमेट फंड आणि युएनडीपी इंडिया यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रकल्पाचा उद्देश स्थानिक समुदायांच्या सहभागातून किनारपट्टीवरील परिसंस्थांचे पुनरुत्थान करणे आणि ग्रामीण महिलांसाठी हवामान बदलाला अनुकूल अशा उपजीविकेची साधने निर्माण करणे हा आहे. आपल्या दौऱ्यात डॉ. ॲजेंला लुसिगी यांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल व उरण तालुक्यातील मोठी जुई, विंधणे आणि गव्हाण या गावांना भेट दिली. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी प्रकल्पाच्या प्रगतीवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग दक्षिण कोंकण कांचन पवार, कांदळवन विभाग अलिबागाचे वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर, उरण तालुका कृषी अधिकारी श्रीमती ऋतुजा नारनवर, राज्य प्रकल्प अधिकारी विक्रम यादव व संबंधित विभागांचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते.







