वीज बिलाची मोठी रक्कम थकीत
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या थंड हवेचे ठिकाणी देशभरातून पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या सुविधेचा महत्त्वाचा भाग असलेले माथेरान शहरातील रस्त्यांवर तीन दिवस अंधार होता. त्यानंतर पालिकेने 10 लाखाचे बिल अदा करून आपली अब्रु वाचवली आहे. येथील पथदिव्यांचे बिल एमएमआरडीएने थकवले असून, त्याचा आर्थिक भुर्दंड माथेरान नगरपरिषदेवर पडत असल्याचा दावा नगरपरिषदेने केला आहे.
माथेरान शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा पथदिवे असल्यामुळे ते याठिकाणी रात्री अपरात्री येणाऱ्या पर्यटकांसाठी उपयुक्त ठरत असतात. शहरातील प्रमुख रस्ते आणि प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्त्यांच्या आजुबाजूला पथदिवे माथेरान नगरपरिषदेकडून बसवण्यात आले आहेत. या सर्व पथदिव्यांची वीज देयके सप्टेंबरपर्यंत 28 लाख 38 हजार रुपयांपर्यंत थकली होती. त्यामुळे महावितरणकडून वीज देयके भरण्यासाठी पालिकेकडे तगादा लावण्यात येत होता. मात्र, पालिका प्रशासनाने वीज देयके 18 सप्टेंबर पूर्वी भरली नसल्याने शेवटी महावितरण कंपनीने 22 सप्टेंबर रोजी वीज पुरवठा खंडित केला. त्याचा परिणाम माथेरान शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेले पथदिवे उजळले नाहीत. त्यानंतर वीज देयक थकीत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना कळली.
वीज देयक भरले नसल्याने येथील वीज पुरवठा खंडित केला असल्याचे स्पष्ट झाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड नाराजी व्यक्त केली. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर माथेरान नगरपरिषदेकडून तात्काळ 10 लाख 29 हजाराचा धनादेश गुरूवारी (दि.25) महावितरण कार्यालयात पाठवण्यात आला आहे. महावितरण कंपनीकडून त्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत केला असला तरी थकीत रक्कम पुढील महिन्यांत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माथेरान शहरात 50 हून अधिक ठिकाणी पथदिवे बंद आहेत आणि तरी देखील त्यांचे बिल दिले जाते. माथेरान शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून रस्त्यांची कामे केली गेली आहेत. त्याच विभागाकडून पथदिवे बसवण्यात आले असून त्याचे देयक मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरणे होते. त्यांच्याकडून वीज देयकांची रक्कम भरली जात नसल्याने त्यांचा संपूर्ण आर्थिक भुर्दंड माथेरान नगरपरिषदेवर येत आहे.
भारत पाटील,
अधिकारी, माथेरान नगरपरिषद







