। नागपूर । प्रतिनिधी ।
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिममधील समृद्धी महामार्गावर ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा तपास वाशिम पोलीस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली. संभाजीनगरवरून नागपूरकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने पिकअपला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहतील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ चॅनल क्रमांक 213 वर झाला आहे. पीकअप टोमॅटो घेऊन नागपूरकडे जात होता. तर आयशर ट्रक हा छत्तीसगडला जात होता. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने त्याने पिकअपला धडक दिली. भरधाव ट्रकने पिकअपला इतक्या जोरात धडक दिली की त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन्ही वाहनं समृद्धी महामार्गावरून बाजूला काढण्यात आली आहेत. पोलीस सध्या या अपघाताचा तपास करीत आहेत.







