| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील उमरोली येथील हेरंब रेसिडेन्सी इमारतीत चौथ्या मजल्यावर स्लॅबचे काम करताना खाली पडून 30 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहम्मद अकबर कलामुद्दीन मिया आलम असे मृत कामगाराचे नाव असून, तो मूळचा बिहारमधील गोपाळगंज येथील रहिवासी होता. बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध नसल्याच्या आरोपावरून पनवेल तालुका पोलिसांनी हेरंब रेसिडेन्सी, श्री सिद्धिविनायक बिल्डर्स आणि बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जखमी अवस्थेत त्याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.






