| मुंबई | प्रतिनिधी |
गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. पावसामुळे रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्र, शेतीचे, घरांचे, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांना या पुरपरिस्थिमध्ये जीवही गमवावा लागला आहे.
मराठवाड्यात सहा जिल्ह्यांत पुन्हा एकदा पावसाने थैमान घातला. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने कर्नाटक, तेलंगणाकडे जाणारे मार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्ते बंद झाले. नदी, नाले यांनी प्रवाह बदलले होतेच, शनिवारी पाणी पसरतच गेले. गोदावरी, हिंगोलीमध्ये कयाधू, बीड, लातूर आणि धाराशिवमधून जाणाऱ्या मांजरा नदीला पुन्हा पूर आला. या पावसाळ्यात मराठवाड्यातील 2857 गावांत शेती बाधित झाली आहे. जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात पावसाने 90 बळी घेतले आहेत.
अनेक भागांत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकास बोलवावे लागले. पुन्हा एकदा परंडा तालुक्यास पुराने झोडपले. नांदेड, बीड शहरात पाणी घुसले. शाळा आणि अगदी पोलीस ठाण्यापर्यंत पाणी शिरले. मराठवाड्यात लातूर, नांदेड जिल्ह्यातील शाळा व शिकवणी वर्गास शनिवारी सुट्टी देण्यात आली होती. जायकवाडी धरणातून रविवारी सायंकाळी 37 हजार प्रति सेकंद घनफूट वेगाने पाणी सोडण्यात येत होते. पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन धरण 96 टक्क्यापर्यंत कमी करण्यात आले आहे.
परभणी, नांदेडमध्ये पूर
गोदावरी आणि सिंदफना नदीमुळे परभणी व नांदेड जिल्ह्यात पूर आला असून, नांदेड-हैदराबाद या प्रमुख मार्गांसह जिल्हाभरातील अनेक मार्गांवरील वाहतूक बंद झाली. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून पांडुरंग निवृत्ती कदम (वय 47) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील भवानी तांडा येथील शेतकरी जयराम धनाजी पवार यांच्या 35 शेळ्या शुक्रवारी सायंकाळी वाहून गेल्या.
शाळेत चार फूट पाणी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील लाडझरी येथे पावसाचे पाणी जिल्हा परिषद शाळेत चार फूट पाणी साचले. बडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतही पाणी शिरले. बीड शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्याने शहरालाच नदीचे स्वरूप आल्यासारखी स्थिती होती. लातूर जिल्ह्यात चाकूर, निलंगा आणि औसा तालुक्यात पावसाचा जोर वाढला. अनेक ग्रामीण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील जवळपास 17 ग्रामीण रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे 11 दरवाजे उघडत 42000 प्रतिसेकंद घनफूट वेगाने विसर्ग केला जात आहे. केजमधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडत नदीपात्रात 27166 प्रतिसेकंद घनफूट वेगाने पाणी सोडले जात आहे.
मराठवाड्यातील भीषण स्थिती
बाधित गावांची संख्या 2857
मृत्यू झालेल्या व्यक्ती 90
जनावरांचे मृत्यू 2534
बाधित शेतकऱ्यांची संख्या 36,17,172
एकूण बाधित क्षेत्र 22, 47,980 हेक्टर
पूर्ण झालेले पंचनामे : 72.74 टक्के
मराठवाड्यातील रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्र यांचेही मोठे नुकसान आहे. सर्व यंत्रणा सतर्क आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान आणि गरज भासली तर लष्कर मदतीला घेतले जाईल.
जितेंद्र पापळकर,
विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर







