| चिरनेर | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले. त्याचबरोबर यापूर्वी माझे अनेक सत्कार झाले आहेत. परंतु, यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने केलेला हा महासन्मान मी आयुष्यात कधीच विसरणार नाही, असे भावनिक उद्गार महाराष्ट्र भूषण तथा पद्मश्री अभिनेते अशोक सराफ यांनी काढले.
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत उलवे नोड येथील भूमीपुत्र भवन येथे चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ व निवेदिता जोशी सराफ यांचा सपत्नीक नागरी सन्मान रविवारी (दि.28) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते आपल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यापुढे अशोक सराफ यांनी मी महेंद्र शेठ घरत यांच्या प्रेमात पडलो असल्याचा उल्लेख आपल्या भाषणातून केला. त्यानंतर त्यांनी त्यांची अभिनय वाटचाल कशी सुरू झाली. याविषयी सांगताना, अभिनय क्षेत्रात जी काही माझी वाटचाल सुरू आहे. ती केवळ रसिक प्रेक्षकांमुळेच. रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच पार बदलून गेले, उजळून गेले. सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही, असेही ते म्हणाले. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. यापूर्वी माझे अनेक सत्कार झालेत; परंतु हा नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही, असे शेवटी त्यांनी भावनिक उद्गार काढले.
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनते अशोक सराफ यांच्या चाहत्यांच्या तुफान गर्दीने भूमीपुत्र भवन खचाखच भरून गेले होते. यावेळी नरेंद्र बेडेकर निर्मित बहुरूपी अशोकच्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, खासदार सुनील तटकरे,माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महेंद्र घरत म्हणाले, भूमीपुत्र भवनाच्या निर्मितीत माझा सिंहाचा वाटा आहे. उरणचे हुतात्मा स्मारकाची मागणी केली, भूखंड आरक्षित झाला, पण खारफुटीत अडकला. आता तो उभारण्याबाबत मान्यवर मंडळींनी प्रयत्न करावेत. कलेवर मी प्रेम करतो. नाटक, चित्रपट, क्रिकेट यांची मलाही आवड आहे. कला जिवंत राहावी, तिला चांगले व्यासपीठ मिळावे, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला उलवे नगरीत आणले. रसिकांच्या तुडुंब गर्दीत आज त्यांना याचि देही याचि डोळा सर्वांनी पाहिल्याने मलाही मनस्वी आनंद झाला. त्यांना मानाचा मुजरा करतो.







