जोड प्रकल्पांची कामे संथगतीने
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. त्या अनुषंगाने प्रस्तावित रस्ते जोडणीचे प्रकल्प सुरू आहेत, पण बहुतांश कामे संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांचा मार्ग खडतरच असणार आहे.
मुंबईकरांची वाढती गरज भागवण्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी सातत्याने होती. त्यामुळे 1990 च्या दशकापासून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आता विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मेट्रो तसेच जलमार्गाने जोडले जाणार आहे, परंतु जलमार्गाच्या कामाला वेळ लागणार आहे. रस्ते मार्गे विमानतळावर पोहोचण्यासाठी अटल सेतू वगळता इतर जलद मार्ग नसल्याने प्रवाशांना गैरसोईंना सामोरे जावे लागणार आहे.
महामार्गावरील उड्डाणपूल
रोडपाली येथील खाडीवर नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असले तरी त्याला वेळ लागणार असल्याने सध्या वाहतूक मंदावलेली आहे.
कळंबोली जंक्शन विस्तारीकरण
कळंबोली सर्कलचे 700 कोटी खर्च करून विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे, पण यासाठीचा कालावधी मोठा आहे. त्यामुळे विमानतळ सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.
मेट्रो, जलवाहतुकीत दिरंगाई
विमानतळाकडे येण्यासाठी ठाणेपासून इलेव्हेटेड रोडचा प्रस्ताव आहे. वॉटर टॅक्सीसाठी जेट्टी बांधावी लागणार आहे. कोस्टल रोडचे काम अपूर्ण असून, मुंबई, नवी मुंबई मेट्रोसेवा सुरू होण्यासाठी काही वर्षे लागणार आहेत.
रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
पुणे, रायगड जिल्ह्यातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यातून वाट काढावी लागणार आहे. मुंबई-पुणे महामार्गाकडून येणाऱ्या मार्गिकांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पळस्पे फाट्यावर मार्ग काढताना नाकीनऊ येणार आहेत. डोंबिवली, कल्याण, भिवंडी, ठाणे परिसरातून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.







