। खालापूर । प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून जेवणात अळ्या, झुरळ असे कीटक सातत्याने आढळत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आता चौक बाजारपेठेत येथील एका नामांकित हॉटेलमध्ये पाल आढल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वडापाव खाताना ग्राहकाला वड्यामध्ये पाल आढळल्याने सोमवारी चौक गावात मोठी खळबळ माजली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी हॉटेल बंद पाडले.
मिळालेल्या माहितीनुसार, चौक बाजारपेठेत उजाला हाॅटेलमध्ये सोमवारी (दि. 29) नाश्ता करण्यासाठी भरत वाघ हे गेले होते. या वेळी वडापाव खाताना त्यांना तोंडात काहीतरी वेगळे जाणवल्याने भरत यांनी वडा कुस्करून पाहिला असता पूर्ण वाढ झालेली पाल मृतावस्थेत आढळून आली. या घटनेनंतर येथील ग्राहकांनी हाॅटेलमालकाला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, ही घटना चौक गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर जागरूक ग्रामस्थांनी हाॅटेलमालकाला हाॅटेल बंद पाडण्यास भाग पाडले. या अगोदरदेखील येथील हॉटेलमधील खाद्यपदार्थात झुरळ आढळले होते. आता पाल आढळल्याने अन्न प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.







