अखेर नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव
| रायगड | प्रमोद जाधव |
नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाला काय नाव द्यायचे अखेर ठरले आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे नावाचा प्रस्ताव पाठवला होता. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील विमानतळ असे नाव देण्याची मागणी केली जात होती. अखेर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाआधी सरकारने नावाचा प्रश्न सोडवला असून, दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्य सरकारकडून एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आले होते. सरकारकडून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याच्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार केला आहे. यामुळे विमानतळ नामकरणाच्या संदर्भात सर्वपक्षीयांकडून काढण्यात येणारा मोर्चा तात्पुरता स्थगित केल्याची माहिती देण्यात आली.
नवी मुंबई विमानतळावरून आता विनाअडथळा उड्डाणे होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून एरोड्रोम लायसन्स जारी करण्यात आले आहे. विमानतळाचे नियमित उड्डाण सुरू करण्यासाठी हा परवाना अत्यावश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 8 आणि 9 ऑक्टोबर असा मोदींचा दोन दिवसांचा मुंबई दौरा असणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो-3 आणि इतर काही विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. तर, 9 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल 2025 ला उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर हे देखील ग्लोबल फिनटेक फेस्टला उपस्थित असतील.
दि. बा. पाटील यांनी शेतकऱ्यांसह भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला. त्यामुळे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीशेतकरी कामगार पक्षासह भूमीपुत्रांकडून करण्यात आली. अखेर या मागणीची दखल सरकाने घेतली असून लोकनेते दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिले जाणार आहे. बुधवारी होणाऱ्या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यापासून दि.बा.पाटील यांच्या नावाने नवी मुंबई विमानतळाला ओळखले जाणार आहे.
दिनकर बाळू पाटील तथा दि. बा. पाटील हे त्या काळात पनवेल-उरण भागातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचे सभागृह दाणाणून सोडणारे नेते अशी त्यांची ख्याती त्यावेळी होती. कवडीमोल भावाने जमीनी घेणाऱ्या सिडकोसह सरकारला धारेवर धरत साडेबारा टक्के विकसीत भूखंड देण्याची मागणी त्यांनी त्यावेळी केली. अखेर सरकारला त्यांच्या मागणीपुढे नमते घ्यावे लागले. त्यामुळे जमीनी जाऊन देखील येथील भूमीपूत्र त्याच ठिकाणी टीकून राहिला. दि. बा. पाटील यांच्यामुळे भूमीपूत्र टिकला. त्यांचे राजकीय, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा दिला आहे. कष्टकऱ्यांचा असामान्य योध्दा म्हणून ते आजही भूमीपूत्रांच्या हृदयात आहेत.
नवी मुंबई येथील परिसरातील हजारो एकर जमीन संपादीत करून आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या मागील काही वर्षापूर्वी हालचाल सुरु झाली. या विमानतळाला शेतकरी, कष्टकरी, भूमीपुत्रांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी शेतकरी कामगार पक्षाकडून कायमच करण्यात आली. त्यांच्या या मागणीला सर्व पक्षीय दुजोरा देण्यात आला. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रांनी अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढले. अखेर सरकारने भूमीपुत्रांच्या मागणीला दुजोरा देत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी जोर धरत होती. अखेर मागणीची दखल घेण्यात आली असून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.राज्याने सुचविलेल्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिक्कामोर्तब केला आहे.त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव दिले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि.8) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाणार आहे. त्यामूळे पनवेलसह नवी मुंबई परिसरातील भूमीपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि. बा. पाटील यांचे राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान राहिले आहे. स्थानिक भूमीपूत्रांसाठी अनेक लढे दिले आहेत.नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव अगोदर दिले असते, तर भूमीपुत्रांसह स्थानिकांना अधिक दिलासा मिळाला असता. दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब सरकारने आता केला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याने खुपच आनंद झाला आहे.
जयंत पाटील
सरचिटणीस
शेतकरी कामगार पक्ष






