। मुंबई । प्रतिनिधी ।
गर्दीच्या रेट्यामुळे धावत्या लोकलमधून पडून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. गणेश जगदाळे (31) असे मृत जवानाचे नाव असून, ते दहिसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शुक्रवारी (दि. 3) सकाळी साडेआठच्या सुमारास ते ड्युटी संपवून दहिसर स्थानकातून नायगावला जाण्यासाठी लोकल पकडली. मात्र, प्रचंड गर्दीमुळे ते दरवाज्याजवळ उभे असताना मालाड-गोरेगाव दरम्यान धक्का बुक्की झाली आणि ते रुळावर पडले. गंभीर दुखापतीमुळे त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मुंबईत गर्दीच्या वेळी प्रवासी लोकलमधून पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना थांबत नसल्याने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधी गोरेगाव पूर्वेकडील वनराई पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. मात्र, बदली झाल्यानंतर दहिसर पोलीस ठाण्यात रुजू झाले. अवघा एक दिवस दहिसर पोलीस ठाण्यात सेवा केल्यानंतर काल सकाळी हा अपघात झाला. लोकलमध्ये वाद, हाणामारीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याशिवाय प्रशासनाला वाढत्या गर्दीवर अद्याप तोडगा काढताच आला नाही. मुंबई लोकलमध्ये गर्दीने दररोज उच्चांक गाठला जातोय. सकाळच्या वेळेस लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. त्यात वेळेवर ऑफिस अन् घरी जाण्याची लोकांची पळापळ असते. अशावेळी लोकलच्या दारात अनेकजण उभे राहतात. तर गर्दीमध्ये जागा मिळाली नाही, धक्का लागला म्हणून अनेकदा वाद होतो. पण हा वाद जवानाच्या जीवावर बेतला आहे. लोकलच्या गर्दीमधील रेट्यामुळे लोकलच्या दारातून पडून जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.







