। कर्जत । प्रतिनिधी ।
पुणे – मुंबई प्रवासा दरम्यान कोणार्क एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांमध्ये हा प्रकार घडला असून, चालत्या गाडीतून खाली फेकल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मयत तरुणाचे नाव विनोद कांबळे (20), रा. पुणे असे असून, तो त्याचा मित्र गणेश देवकर (26) याच्यासोबत दर्शनासाठी मुंबईला जात होता. दोघे कोणार्क एक्सप्रेसच्या दरवाज्यात बसले होते. त्याच वेळी दुसर्या प्रवाशाला थुंकण्यासाठी जागा हवी होती, म्हणून त्याने दरवाज्यात बसलेल्या विनोदला उठण्यास सांगितले. या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला आणि झटापट झाली. गाडी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कर्जत स्थानकात पोहोचली व 2.10 वाजता निघाल्यानंतर भिवपुरी स्थानकाअलीकडे ही घटना घडली. झटापटी दरम्यान विनोद हा गाडीबाहेर फेकला गेला. गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विनोदचा मित्र सुखरूप असून, त्याने पोलिसांना संपूर्ण माहिती दिली आहे. या प्रकरणात अकोला येथील मंगेश दरोसे (36) या व्यक्तीस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, तो मिरज स्थानकावरून अकोला जाण्याऐवजी चुकीने मुंबईकडे जाणार्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये बसला होता. सदर घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, कर्जत रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







