| तळा | प्रतिनिधी |
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, तळा नगराध्यक्षपद हे आता ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांना गती आली असून उमेदवारी कोणाला मिळेल, यासाठी तालुकावासीयांसह इच्छुकांनाही उत्सुकता आहे. तळा नगरपंचायत झाल्यानंतर प्रथमच नगराध्यक्षपदासाठी ही थेट निवडणूक होत असून, थेट नगराध्यक्षपदाचा मान आता कोणत्या ओबीसी पुरुष किंवा महिलेला मिळणार, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारणसाठी इच्छुकांची संख्या जास्त होती; परंतु, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष किंवा महिला आरक्षण निघाल्यामुळे या इच्छुकांची मोठी पंचायत झाली आहे. आता ओबीसी पुरुषाला आपल्या गटाकडून, पक्षाकडून उभे करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वजण शोध चर्चा बैठका घेण्याची तयारी सुरू झाली आहे.







