। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव शहरातील प्रसिद्ध अशा राठोड हॉस्पीटल आणि धनलक्ष्मी मेडिकलचे मालक परेश मोहनलाल राठोड यांचे मंगळवारी (दि.8) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजारपेठेतील मोतीराम प्लाझा समोर मुंबई- गोवा महामार्गावर दुचाकीवरून जात असताना अपघात झाला. या अपघातानंतर त्यांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. परेश राठोड हे अत्यंत मनमिळाऊ आणि शांत संयमी स्वभावाचे होते. त्यांनी अनेक गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ दिला होता. त्यामुळे ते संपूर्ण तालुक्यात परिचित होते. अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने मित्र परिवार उपस्थित होता. मृत्यू समयी त्यांचे वय 59 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.







