अत्याधुनिक एआय ॲप विकसित; सर्व माहिती एकाच ठिकाणी होणार उपलब्ध
| चिरनेर | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांना हवामान तसेच बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यावर उपाययोजना म्हणून, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून ‘महाविस्तार एआय’ हे अत्याधुनिक ॲप विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिली. चिरनेर येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात गुरुवारी (दि.9) शेतकऱ्यांसाठी एआय ॲप विषयीच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
उरण तालुक्यातील गावागावांत कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी एआय ॲपचे प्रशिक्षण राबविले जात आहेत. दरम्यान, चिरनेर येथे एआय ॲपच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देत आहे. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रियल टाईम, माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतीचे मार्गदर्शन करते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी ‘महाविस्तार एआय’ ॲपमधील एआय’ बॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देणे, रियल टाईम, हवामान अंदाज, तसेच स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात, अशी माहिती त्यांनी प्रशिक्षणातून दिली. तसेच, स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव, रियल टाईम तसेच कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
‘डिजिटल क्रांतीचा भाग व्हा'
या ॲपचे मराठीत व्हिडिओ उपलब्ध आहेत. पिकांची लागवड व खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत तपशील वार मार्गदर्शन, तसेच ॲपमधील एआय तंत्रज्ञानामध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडीचे निदान करून त्याच्यावर उपाय शोधू शकतात. महाविस्तार एआय ॲप शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनविण्यासाठी अनेक फायदे घेऊन आले आहे. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. हे ॲप घ्या आणि शेतीतील डिजिटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.







