| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पशुसंवर्धन विभागामार्फत अलिबाग तालुक्यातील उमटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.10) जागतिक अंडी दिवस साजरा करण्यात आला. हा उपक्रम जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. सचिन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या नाविन्य उपक्रमातून अंडी खाण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभागाने केला.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी अंडी दिवस साजरा केला जातो. यंदाही हा दिवस शुक्रवारी अलिबागसह जिल्ह्यातील इतर जि.प. शाळांमध्ये राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ व पोषक राहवे, यासाठी हा उपक्रम हाती घेतला असून अंडी खाण्याचे महत्व शालेय स्तरापासून निर्माण करण्यासाठी हा उपक्रम अलिबागसह जिल्ह्यात घेण्यात आला. अलिबाग तालुक्यातील उमटेसह पेझारी, भोवाळे तसेच अन्य तालुक्यातील 50 हून अधिक शाळांमध्ये जागतिक अंडी दिवस साजरा करण्यात आला. शरीराला पोषण तत्वे मिळण्यासाठी अंड्याचे सेवन फायदेशीर असते. त्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभागाने नाविन्य उपक्रमातून केला. अंड्याचे दैनंदिन आहारात वापर होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले. यावेळी पशुधन पर्यवेक्षक अनिल गोतकर, मैत्री प्रशिणार्थी साईजित गुरव, मुख्याध्यापक राजेश शेळके, शिक्षक महेश वेरुळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





