| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड-जंजिरा एसटी आगारातील नादुरुस्त बससेवा तात्काळ कायमस्वरूपी बंद करून प्रवाशांना सुरक्षित व दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी मुरूड येथील नागरिकांनी राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे लेखी निवेदन सादर केले. या निवेदनाची प्रत मुरूडचे तहसीलदार आदेश डफळ यांनाही देण्यात आली.
यावेळी जनतेच्या वतीने नगरसेवक ॲड. रुपेश पाटील यांनी एसटी बसेसच्या दुरवस्थेबाबत तहसीलदारांसमोर विविध समस्या मांडल्या. तसेच, या प्रश्नावर तातडीने बैठक बोलावून रायगड विभागीय नियंत्रक डॉ. सुहास चौरे यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, मुरूड आगारातील एसटी बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असून, प्रवाशांना अत्यंत निकृष्ट दर्जाची सेवा मिळत आहे. बसेसची अवस्था पूर्णपणे जीर्ण झाली असून वाहनांचे चाक निखळणे, फाटलेले टायर वापरणे, चालक-वाहकांची कमतरता, बसेस वेळेवर न सुटणे अशा अनेक गंभीर समस्या सातत्याने समोर येत आहेत.
या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांची भेट घेऊन बैठका घेतल्या; मात्र केवळ आश्वासने देण्यात आली असून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. लवकरच शाळा सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात एसटी सेवेवर अवलंबून आहेत. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांची जनतेसमोर बैठक आयोजित करून त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक ॲड. रुपेश पाटील, ललित जैन, कुणाल सतविडकर, जाहिद फकजी, जनार्दन कंधारे, भारत रांजणकर, राजेंद्र कजबजे, अनंत जोशी, सुशील ठाकूर, अजित गुरव, अजित कासार, विशाल कोलवणकर, उमेश भोईर, मॉन्टी दांडेकर, महेश मानकर आणि स्वप्निल कवळे उपस्थित होते.







