| पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुका पंचायत समितीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी चार सदस्यांच्या आरक्षणाची सोडत कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात काढण्यात आली. यावेळी चारपैकी तीन पंचायत समिती गणांची नावे गणातील मोठ्या लोकसंख्येच्या गावानुसार बदलण्यात आली आहे.
पोलादपूर पंचायत समितीची 24 ऑक्टोबर 2016 रोजी आरक्षणाची बैठक होऊन 2017 मध्ये निवडणूक झाली. यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर आरक्षणाच्या बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेकडून करण्यात आले. यावेळी पूर्वीचे गण मोठया लोकसंख्येच्या गावांच्या नावानुसार बदलण्यात येऊन गोवेले ऐवजी माटवण, देवळे ऐवजी कापडे, कोंढवी ऐवजी कोतवाल बुद्रुक आणि लोहारे गणाचे नांव पूर्वीचेच कायम ठेवण्यात आले.
आरक्षणात चारपैकी एका गणातून नागरिकांचा मागास प्रवर्ग असण्याची अपरिहार्यता लोकसंख्येच्या निकषानुसार असल्याने चिठ्ठीद्वारे 115 माटवण पं.स. नामाप्र महिला आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर उर्वरित तीन गणांपैकी चिठ्ठीद्वारे 117 लोहारे गणाचे सर्वसाधारण आरक्षण महिला राखीव झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे 118 कोतवाल बुद्रुक आणि 116कापडे बुद्रक सर्वसाधारण तसेच लोहारे सर्वसाधारण महिला व माटवण नामाप्र महिला असे आरक्षण जाहिर झाले. यापूर्वीच पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहिर झाले आहे. याच दरम्यान अलिबाग येथे रायगड जिल्हा परिषदेच्या पोलादपूर तालुक्यातील दोन गटांचे आरक्षण जाहिर करण्यापूर्वी गट क्रमांक 60 देवळेचे कापडे बुद्रुक असे नामांतर झाले असून या गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण तर पूर्वीच्या लोहारे गट क्रमांक 61चे कोतवाल बुद्रुक नामांतर करण्यात येऊन सर्वसाधारण आरक्षण जाहिर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
2011च्या जनगणनेनुसार पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाचे प्रवर्ग कायमच राहिले असून 2021साली जनगणना झाली नसल्याने कोणताही बदल झाला नाही. पोलादपूर येथील आरक्षण बैठकीची सूत्रे स्वत: तहसीलदार कपिल घोरपडे यांनी हाताळली आणि चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्याकामी जनसेवा प्राथमिक शाळेची इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी रिध्दी रवींद्र मोरे हिने सहकार्य केले. या बैठकीला रामदास कळंबे, निलेश अहिरे, लक्ष्मण मोरे, सतीश शिंदे आदी शिवसेनेचे तर भाजपचे तालुका अध्यक्ष वैभव चांदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती दिलीप भागवत, अजय सलागरे, कोतवाल बुद्रुकचे माजी सरपंच महेश दरेकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







