खासदार श्रीरंग बारणे यांना विसर
| उरण | प्रतिनिधी |
2018 साली पनवेलमध्ये स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय होणार, अशी कबुली खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतले आहे. मात्र, यासंदर्भातील काही बाबी पूर्ण होण्यास किमान 6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र, या आश्वासनाला 7 वर्षे उलटली असून नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन देखील झाले. त्यामुळे खासदार श्रीरंग खासदार बारणे यांना त्यांच्याच दिलेल्या आश्वासनाचा विसर पडल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.
पनवेल हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती असे ठिकाण आहे. त्यामुळे याठिकाणी पोहचणे सोयीचे आहे. सध्या जिल्ह्यातील रहिवाशांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे शहर गाठावे लागते. दळणवळणाच्या दृष्टीने हे अंतर जास्त आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयामार्फत दिलेल्या वेळेत पोहोचणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होतो. पनवेलमध्ये पासपोर्ट कार्यालय झाल्यास नागरिकांच्या वेळेची बचत होईल, शिवाय पासपोर्ट वेळेत उपलब्ध होईल. 2018 मध्ये पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची योजना होती; परंतु, जागेअभावी हे शक्य झाले नाही. त्यानंतर हे केंद्र तात्पुरत्या स्वरूपात अलिबाग येथे हलवण्यात आले होते. डिसेंबर 2024 मध्ये खासदार बारणे यांनी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन पनवेल येथे पुन्हा पासपोर्ट केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिलेल्या शब्दाचा त्यांनाच विसर पडला असून नवी मुंबई विमानतळ उद्घाटन झाले तरी पासपोर्ट कार्यालयाला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.







