जिल्ह्यात पाचशेहून अधिक जणांना फटाके विक्रीचे परवाने
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिवाळी सण म्हणजे फटाक्यांची आतषबाजी, या दिवसांमध्ये फराळाचा आस्वाद घेत असताना फटाके फोडून आनंद साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा आजही कायमच आहे. जिल्ह्यातील नागरिकांना प्रत्येक प्रकारचे फटाके उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये फटाके विक्रीची दुकाने सजली आहे. आतापर्यंत 40 टक्केहून अधिक खरेदी झाली असून आपटी बॉम्ब, पॅराशुट, सुतळी बॉम्ब, चिमणी बार, पाऊस चक्री,अशा अनेक प्रकारच्या फटाक्यांना मागणी असून जिल्ह्यातील मान्यता प्राप्त 500 हून अधिक दुकानांमध्ये फटाके खरेदीला गर्दी असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी (दि.17) वसूबारस, शनिवारी (दि.18) धनत्रयोदशी होती. त्यामुळे शुक्रवारपासून दिवाळीला सुरुवात झाली असली तरी, सोमवारी (दि.20) नरक चतूर्दशीपासून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली जाणार आहे. नवीन कपडे परिधान करून पुजन करून फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी फटाके खरेदीला सुरुवात झाली आहे. प्रत्येकजण आपआपल्या ऐपतीप्रमाणे फटाके खरेदी करीत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील अलिबागसह अन्य बाजारपेठांमध्ये फटाके विक्रीची दुकाने सजली आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागात नाक्यानाक्यावर फटाक्यांची दुकाने उभी केली आहे. पोलीस आणि महसूल विभागाची परवानगी घेऊनच फटाके दुकाने उभारल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे 500 हून अधिक फटाक्यांची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये फटाके खरेदीला गर्दी होत आहे. संध्याकाळी फटाके खरेदीसाठी ग्राहकांची लगबग असल्याचे दिसून आले आहे.
आतापर्यंत 40 टक्केपेक्षा अधिक खरेदी झाल्याची माहिती विक्रेते हर्ष ढवळे यांनी दिली. यंदा फटाक्यांच्या किंमती स्थिर असून ग्राहकांना सवलतीच्या दरात फटाके विकले जात आहे. जिल्हयातील वेगवेगळ्या दुकानामध्ये फटाके खरेदीवर सवलती दिल्या जात आहे. तीन हजारच्या खरेदीवर तसेच दहा टक्के सवलतीवर फटाके विक्री करण्यात आले आहेत. फटाक्यांच्या किंमती 20 रुपयांपासून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहेत. त्यामध्ये आपटी बॉम्ब 20 रुपये, हजारची माळ तीनशे रुपये, बॉम्ब 120 रुपये, पॅराशुट 50 रुपये, माचीस बॉम्ब 20 रुपये, पाऊस चक्र 100 रुपये, स्काय शॉट शंभर रुपये, सुतळी बॉम्ब शंभर रुपये, पेन्सील फुलबाजे साठ रुपये आणि माळा 70 रुपये अशी किंमत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.







