तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांची बांधावर पाहणी
| पोलादपूर | प्रतिनिधी |
राज्य सरकारने जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यात पडलेल्या अतिवृष्टीबाधित 31 जिल्ह्यांतील 253 तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचनामे करण्यासंदर्भात शासन आदेश जाहीर केला असून, पोलादपूर तालुक्यात यापैकी शेतांचे पंचनामे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुरू करण्यात आले आहेत.
पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी 15 ऑक्टोबरला तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसानंतर तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांच्यासोबत महाळुंगे गावातील शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार पीकपंचनामा करण्यासाठी दि.17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. याप्रसंगी शेतकऱ्यांसमवेत तालुका कृषी कार्यालयाचे आत्मा समन्वयक कपिल पाटील, रवींद्र गुंड व अन्य कृषीसहायक उपस्थित होते. यानंतर संपूर्ण तालुक्यात ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक व सहायक तसेच तलाठी यांच्यामार्फत संयुक्त पंचनामे करण्यासाठी सुरूवात करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार शेतीपिकाच्या नुकसानीसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेत जिरायत पिकांसाठी 8500 रूपये प्रतिहेक्टरी, 3 हेक्टरच्या मर्यादेत आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके हेक्टरी 17 हजार रूपये, 3 हेक्टरच्या मर्यादेत बहुवार्षिक पिके 22 हजार 500 रूपये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर व निकष असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याखेरिज, पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी व अंशत: नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठीचे अनुदान, झोपडी व गोठा यांच्या पडझडीसाठी मदत, मृत जनावरे आणि शेतजमिनीचे नुकसान याबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलादपूर तालुक्यात अन्य पंचनामे आणि मदतकार्य कधी सुरू होणार, या प्रतिक्षेत तालुक्यातील शेतकरी असून, शासनाकडून विशेष मदत पॅकेजचा लाभ मिळण्यासाठी तहसीलदार घोरपडे आणि तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे हे प्रयत्नशील आहेत. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांचा अतिवृष्टी आणि आपदग्रस्त यादीत समावेश असून, रायगड जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांचा समावेश यादीमध्ये असल्याने पोलादपूर तालुक्यात या शासननिर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.







