पवईतील रा स्टुडिओमधील घटना
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील पवई येथे एका इसमाने जवळपास 20 अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. चांदिवली येथील रा स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत आरोपीने 15 वर्षांखालील जवळपास 20 मुलांना डांबून ठेवले होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पवई पोलीस, साकीनाका पोलीस व अग्निशमन दलाने या मुलांची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या स्टूडिओमध्ये ऑडिशन सुरू होते. आज देखील या स्टूडिओमध्ये ऑडिशनला सुरुवात झाली. 100 मुलं ऑडिशनसाठी आले होते. याचदरम्यान या स्टूडिओमध्ये काम करणाऱ्या आणि यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या रोहित आर्या याने त्यातील 80 मुलांना घरी पाठवले. पंरतु उर्वरीत सर्व मुलांना त्याने तेथील स्टूडिओच्या एका रूमध्ये बंद केले. या व्यक्तीनं 1 वाजेपासून ते 4 पर्यंत असं तब्बल तीन तास या मुलांना एका खोलीमध्ये डांबून ठेवले होतं. मुलं जेवणासाठी आली नाहीत, म्हणून हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुलांना स्टूडिओमध्ये डांबून ठेवल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही बाजूने स्टूडिओला वेढा टाकला. त्यानंतर पोलिसांनी या मुलांची अखेर आता सुटका केली आहे. या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीच्या मागण्या नेमक्या काय होत्या, आणि त्याने मुलांना डांबून का ठेवले हे अजूनही अस्पष्ट आहे. घटनेबाबत तपास सुरू आहे. दरम्यान आरोपी हा मनोरुग्ण असल्याची माहिती आता समोर येत आहे.







