अनेक भाविक जखमी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील दहिवली येथून देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांच्या बसला इगतपुरी येथे अपघात झाला. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत.
दहिवली येथील काही महिला भाविक शनिवारी (दि.1) पहाटे देवदर्शनासाठी शेगावकडे बसने निघाल्या होत्या. या महिला शेगाव आणि त्यानंतर पंढरपूर इथे दर्शन घेऊन परतणार होत्या. मात्र दुर्दैवाने इगतपुरी इथे या बसचा अपघात झाला. यावेळी बसमध्ये 24 महिला होत्या. या अपघातात ढाक येथील बसचालक दत्ता ढाकवळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर महिलांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. देवदर्शनासाठीच जाताना अशी घटना घडल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.







