1 हजार 334 मुर्तींसह 192 प्रतिमांचे विसर्जन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवरात्रौत्सवानिमित्त नऊ दिवस देवीची पुजा करण्यात आली. मनोभावेसेवेनंतर दुर्गा मातेला दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी (दि.20) निरोप देण्यात आला. दरम्यान, ग्रामीण व शहरी भागात सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील 1 हजार 334 दुर्गा मुर्तींचे विसर्जन तलाव, नदी व समुद्रात करण्यात आले. विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. त्यामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात रविवारी (दि.11) देवींचे स्वागत करण्यात आले होते. सकाळी विधीवत पुजा करून 5 हजार 53 ठिकाणी घट स्थापन करण्यात आले. त्यामध्ये 1 हजार 334 मूर्तींची प्रतिष्ठापना आणि 192 देवींच्या प्रतिमांची स्थापना करण्यात आली. गेल्या नऊ दिवसांपासून जिल्ह्यात नवरात्रौत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण व शहरी भागातील नाक्यानाक्यावर नवरात्रौत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला. या कालावधीत दांडिया, गरबासह वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले. तसेच, आरोग्य विषयक उपक्रमांसह खेळाच्या स्पर्धा आणि भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांसाठीदेखील पैठणीसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. काही ठिकाणी गरब्यासह शिवकालीन पोवाड्यांचे आणि जाखडी या पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे हा सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.
त्यानंतर मंगळवारी (दि.20) दुर्गा विसर्जनासह विजयादशमी (दसरा) साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी विधीवत पुजा करून नवनवीन कपडे परिधान करून देवीची आरती घेण्यात आली. त्यानंतर स्थापन केलेले घट काढण्यात आले. सायंकाळी दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाची तयारी करण्यात आली. गावासह शहरी भागातून देवीच्या मूर्तीची खालूबाजासह ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेकांनी सहभागी होऊन आनंद साजरा केला. यावेळी जिल्ह्यातील तलाव, नदी व समुद्रांमध्ये 1 हजार 334 दुर्गा मुर्ती आणि 192 प्रतिमांचे विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी सायंकाळी साडेसात ते रात्री 10 वाजेपपर्यंत विसर्जन सोहळा सुरू होता.
अशोक विजयादशमी निमित्त जिल्ह्यात जल्लोष
रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवारी (दि.20) बौध्द समाजाच्या वतीने अशोक विजया दशमी आणि धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वेगवेगळ्या संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील बुध्द विहारामध्ये बुध्द वंदना घेण्यात आली.अशोक विजया दशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व पटवून देण्यात आले. अशोक विजयादशमी का साजरी केली जाते, याची माहिती वेगवेगळ्या मान्यवरांमार्फत देण्यात आली. बौध्द समाजातील विजयादशमीचे महत्व आणि क्रांतीकारी स्थान का आहे,याचीदेखील माहितीदेऊन उपस्थितांना संबोधित केले.
जिल्ह्यात सात ठिकाणी रावण दहन
विजयादशमीच्या ( दसरा) दिवशी रायगड जिल्ह्यात सात ठिकाणी रावण दहन केले. रावणाची प्रतिकृती तयार करून अलिबाग तालुक्यातील चिंचोटी, चेंढरे, नागोठणे, महाड, झिराड या ठिकाणी त्यांचे दहन केले. हा सोहळा पाहण्यासाठी 90 हजारहून अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून रावण दहनाची भव्य परंपरा जपण्यात आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावाने गेल्या अनेक वर्षाची रावण दहनाची परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली.







